पीएनजीच्या बिलांनी ग्राहकांना फोडला घाम

Foto
सिलिंडरपेक्षा ४० टक्के अधिक महाग असल्याची चर्चा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात पाइपलाइनद्वारे नैसर्गिक वायू (पीएनजी) पुरवठा सुरू झाल्यानंतर घरगुती ग्राहकांना आता पहिल्याच बिलाचा धक्का बसला आहे. काही ग्राहकांना पाच महिन्यांनंतर सुमारे ३,५०० रुपयांचे बिल मिळाले असून, याच कालावधीत एलपीजी सिलिंडरवर सुमारे २,५०० रुपये खर्च आला असता, अशी त्यांची तुलना आहे. त्यामुळे पीएनजीमुळे खर्चात सुमारे ४० टक्के वाढ झाल्याची भावना ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.
मार्च-एप्रिलदरम्यान इस्रायल आणि आखाती देशांतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक तसेच वाहनांसाठीच्या एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. या काळात पाइपलाइन गॅसमुळे घरगुती ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, कनेक्शन
PNG
मिळाल्यानंतर थेट पाच महिन्यांचे बिल एकत्रित आल्याने ग्राहकांच्या खर्चाचा अंदाजही बिघडला आहे. शहरात सध्या सुमारे १२ हजार घरांना पीएनजीचा पुरवठा होत आहे. गारखेडा, गजानन महाराज मंदिर परिसर, ज्योतीनगर, बन्सीलालनगर आणि बीड बायपास या भागांत कनेक्शन देण्यात आले आहेत. बीड बायपास, सातारा-देवळाई आणि वाळूज महानगर-१ परिसरात पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा सुरू आहे.
मनपाच्या झोन क्रमांक ७, ८ आणि ९ मध्येही नेटवर्क उभारण्याचे काम सुरू आहे.
१ लाख घरांना जोडण्याचे लक्ष्य
श्रीगोंदा ते वाळूज आणि शेंद्रा असा पाइपलाइनचा विस्तार करण्यात येत असून, सुमारे २५० किलोमीटरचे नेटवर्क उभारून एक लाख घरांना पीएनजी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट बीपीसीएलने ठेवले आहे. या योजनेचे काम मार्च २०२२ पासून सुरू आहे. कनेक्शन दिल्यानंतर पहिलेच बिल तयार करण्यात आल्याने काही तांत्रिक किंवा बिलिंगसंबंधी त्रुटी असण्याची शक्यता बीपीसीएलकडून व्यक्त करण्यात आली आहे. ग्राहकांच्या बिलांबाबतच्या तक्रारी लवकरच सोडविण्यात येतील, असे बीपीसीएलचे प्रतिनिधी मनोज जाधव यांनी सांगितले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions